कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

आईक पोरी.. (वऱ्हाडी रचना)

वऱ्हाडी रचना

*आईक पोरी*

पोरी तुले सांगते वं
माय तुई कायजीनं
सावरती व्हयं बाई
नको राहू गलथान...१

चारी दिशा जरी पोरी
दाटल्या वं अंधारानं
बाईपण नाही शाप
ते तं भेटे नशीबानं...२

तू वं देवाची निरमिती
अजब तू वं रसायन
तुयाचं पाशी देलं त्यानं
पुन्ः निरमितीचं देणं...३

तूच जगताची माय
कदी लेक कदी सखी
संकटाले भिऊन तू
अशी होऊ नको दुःखी...४

वासनेच्या गटारात
पोसतात किडे चार
माणुसकी इसरुन
करतात व्यभिचार...५

तू सोताले वयखं
जागो आग तुयातली
नसानसांत चेतू दे
दुर्गा अन् महाकाली...६

दाखो जगाले बी आता
कुठी कोणं ते चुकते
बी इशारी वानाचं
घरातूनच रुजते...७

उखडून टाक आता
तणं सारं जे माजलं
आळीमिळी सोड पोरी
बिगुल येळेचं वाजलं...८

रचना
©शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
(मूळ जि. अकोला)
 दि. १३.१२.१९