कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

नशीब




                   नशीब

समाधानी पावत असतो जीव
नशीबाला दोष दिला की
अन् हवं तसं वागण्यासाठी पुन्हा
मुक्त होतो माणसातला 'मी'....१

खूप वाचतो नि ऐकतोही
की नशीब स्वकर्मावरच ठरतं
बुद्धिजीवी असूनही त्याला
कळलं तरी कुठे वळतं... २

अद्भुत जन्म घेऊनही तो
 जगतो होऊन विषयासक्त
मनवाऱ्यासवे वाहताना
विषयपान करतो विषाक्त... ३

मलिन कर्मसुतांवरती या
वीण गुंफली जाते नशीबाची
फेड करविते निसर्गमाता
दिले-घेतले परतते येथेचि...४

 सत्कर्माची फेड सुखाची
संयम शांती जागविता
 व्यर्थ फोडून खडे  नशिबावर
 कष्टी वळण जीवनी येता... ५

शिल्पकार जो तो येथे
रचियता स्वभाग्याचा आहे
निर्भेळ आनंदाची तू खाण
विसर न तूज होवो पाहे...६

सांडूनी मोहमाया घडव
नशीब तुझे सुवर्णस्पर्शी
आदर्श हो सृष्टीसम नरा
जीवनदर्पण होऊ दे पारदर्शी... ७

रचना
©शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका, बीड
दि १०.११.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: