ग्रामीण जीवन* *आठवणीतले गाव* माझ्या गावाची रे गड्या रम्य मंजूळ ती पहाट वासुदेवाच्या मधुर वाणीनं न्हाते अमृत वर्षावात . . .॥१॥ दिसारंभीच ते श्रवण विठू नामाचा गजर मन होई रे प्रसन्न कर्णमाधुरी तो स्वर. . .॥२॥ भास्करही तो प्राचीचा डोकावतो डोंगरातून त्याच्या सहस्त्ररश्मींनी घालतोया दिव्य स्नान. . .॥३॥ धरणीच्या देहावरी जळ झुळुझुळु वाहे तान्हलेल्या चराचरांची नदीमाय वाट पाहे . . .॥४॥ पाखरांची किलबिल कुठे मोर ते नाचरे गंध चंदनी दरवळ का न होई मन बावरे. . .॥५॥ येता जाता रामराम बंधुभाव ठायी ठायी प्रसंगे मग तो वैरीही मदतीला धावून येई. . .॥६॥ रक्ताच्या नात्यांहूनही मायेच्या त्या शेजारणी शुद्ध प्रितीचाच झरा सदा वाहे त्यांच्या मनी . . .॥७॥ माझा शेतकरी दादा दिन रात्र राबतोयं न्हातो घामांच्या धारांत मोती पीक काढतोयं. . .॥८॥ अवखळ चंचल उनाड वारा छेडतो अंगाला साजनाच्या आठवाने जीव सखीचा भुलला. . .॥९॥ खरी श्रीमंती सृष्टीची खेडेगावाच्या मातीत हरवलेला हा सुगंध शहराच्या डोलार्यात. . .॥१०॥
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा