कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

तडफड जीवनाची

तडफड एकाक्षाची


लोपली ती कुठे
वसुंधरेची हिरवळ
कासावीस चराचर
उजाड हे रानमाळ... १

जन्म 'देणे' विधात्याचे
घास जगाया शोधला
कुठेतरी गवसले
झाड एक घरट्याला...२

दिस मजेत जगलो
राजाराणी चिलेपिले
वादळाने संसाराचे
सुख सारे हिरावले...३

दुःख संकटांचे भार
एकटाच वाहताना
मृत्यू येईना म्हणून
श्वास मागे टाकताना...४

व्याकुळल्या जीवासाठी
यत्ने शोधिले मी जळं
मानवाच्या कुकर्मांची
सोसताना रुक्ष झळं...५

संवेदना हरवली
जळीस्थळी माणसाची
किंमत मग त्यां लेखी
काय या मुक्या जीवाची...६

जीव काहिली काहिली
वन्ही रवी ओकताना
वैशाखात तडफड
जीव भार वाहताना...७

काय वर्णू त्या आनंदा
 कुंभाकडे झेपावून
जल अत्यल्प दिसता
खडे टाकी आसावून...८

आशेच्या दोरीवरती
जीव चालता दमला
निराशेने आवळता
श्वास अंताचा सोडला...९

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 06.04.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: