कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

जलराणी उवाच

जलराणी उवाच... 


ऐकशील का रे हाक
वदते मी'जलराणी' 
कळवळून विनविते मनुजा
वाचवशील ना रे पाणी... १

वसुधा ही व्याकुळ झाली
उजाड हे रानमाळ
मरणासन्न चराचर
सारेच भोगती झळ... २

तुझ्याच कुकर्मांची तू
भोगतोस  तळमळ
पेरले तू जे कर्मबीज 
त्याचीच खातोस फळं... ३

विधात्याचं 'देणं' अनमोल 
जीवनाला वारी 'वारी'
संपता ना उपाय चाले 
प्रतिभाही पडेल अपुरी... ४

अगणित महीवर 'साठे'
नदी - नाले,ओढे, सागर 
उणीवेस कारण झाला 
फक्त तुझा अविचार...५

प्रत्याभरणासम किती उपाय
तुज कळून वळले नाही
होता ओंजळ रिती मनुजा
भरणार कधीही नाही...६

घेणाराने तरी किती घ्यावे
मर्म जाणुनी जलास जपावे
उधळता तू स्वैर 'नीर'
अंती धरेनेच का तडफडावे...७

तहानेने व्याकुळ होता
जीव होई लाही लाही
विचार कर ना थोडा
जर मीच उरले नाही... ८

वाचव रे सुटतोय श्वास
गोतास काळ नको ना होऊ
वेध भयाण भविष्याचा घे 
रुक्ष घोषणांत नको वाहू... ९

'जल हेच जीवन' जाण
सत्य सांडू नको खरोखरी
भ्रमी नकोस राहू भलत्या
सावध हो,जलसंकट ते आसुरी...१०

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका, बीड
दि. ०७.०५.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: