कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

एक अनामिक भीती

एक अनामिक भीती


एका अनामिक भितीने 
मनी काहूर काहूर
छिन्न विच्छिन्न विचार
बोचत मज रातभर..... १



ठोका माझ्या काळजाचा
अवचितच तो वाढला
कुट्ट अंधार एकाकी
डोळ्यांपुढती दाटला...... २



आता काय ते करावे
जीव बुचकळे हाय
रडलेच मी जोराने
वेगे मोकलूनी धाय....३



गच्च मिटताच नयन
आतही तीच धग
उघडता त्या झडपा
बाहेरही तगमग......४



सुन्या सुन्या सुन्न राती
वारा धडके कवाडाला
वाटे कोण बाई आला
अर्ध्या रातीच्या वक्ताला....५ (वेळेला)



आळवत राम राम
कधी मारुतीचे स्तोत्र
भिववत होते मन वैरी
नव्हते तेही तेव्हा मित्र... ६



एकटाच जीव माझा
दोन्ही मुठी आवळूनी
श्वासही झाले स्तब्ध
प्राण कंठाशी आणुनी .... ७



ना निद्रा, ना जागृतीही
भयग्रस्त निशा सरली
मन आले थाऱ्यावर
जेव्हा प्राची उमलली.... ८



रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
 दि. 02.09.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: