कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

बंद कपाटातील पुस्तकाची आत्महत्या...

बंद कपाटातील पुस्तकाची आत्महत्या...

दप्तरातून डोकावताना फलकावर
कधी एक सुविचार पाहिला होता
"पुस्तक हाच सर्वांत चांगला मित्र"
पाहून कोण आनंद दाटला होता..१

कथा-कविता नानाविध रूपी
ज्ञानासह मनोरंजन तुझे केले
तुज प्रगतीपथावर नेण्यासाठी
नको नको ते घाव सोसले...२

ध्येयपथावरचा दीप झालो
साध्य मिळविण्यास साधन
मन-मतीस तुझ्या मढवले
साज ज्ञानालंकार घालून...३

माझ्यात रमून जे गेले
जगी अजरामर ते झाले
आळसाचे मित्र ते सारे
पश्चातापी जळून गेले...४

बुद्धिमानी जीवाने जगी
शिखर सर केले प्रगतीचे
घाव स्वतःच्या पायावरती
चयन करता अधोगतीचे ...५

हळूहळू बेगडी चमचम
तुजं हवीहवीशी झाली
अविचारे  फसलास मोही
मज कपाटकोंडी दिधली...६

वाट पाहून तुझी दोस्ता
शिणलो, खचलो रे पार
"सत्याचे कोंडलेले श्वास"
हे तर कलियुगाचे सार...७

हे मोबाईलवेड्या जीवा
हाकाही किती मारल्या
तू तर पुरता झिंगलेला
मोबाईलच दावी वाकुल्या...८

गलितगात्र झालो,समजले
सर्व काही संपले होते
क्षणोक्षणी दंश मृत्यूचा
जगण्यातही मर्म नव्हते...९

श्वास शेवटाचा सोडताना
शब्द 'भटां'चे स्मरले होते
"मरणाने केली सुटका,
जगण्याने छळले होते."...१०

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 11.04.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: