कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

🙏बाप अभंग

बाप....

संसाराचा कणा | बाहेर काटेरी ||
रसाळ अंतरी |बाप असे ||१||

कुटुंबाचा पाया| भार खांद्यावरी|| 
 पेले जन्मभरी | जन्मदाता ||२||

तमा नयनांत| जरी निशदिन||
ठेवी लपवून| कौशल्याने ||३||

लेकरांच्यासाठी| झिजतो कष्टतो||
ऊरी तो झेलतो| घाव बहू ||४||

अथांग आभाळ| जीव उधळतो||
पुरुन उरतो| बाप एक ||५||

आम्हा लेकरांचं| सजवतो जीणं||
कपाळी तोरण| घर्मधारा ||६||

त्याच्या कष्टांचाच| बहरे सुवास||
सुखाचा तो घास| मुखी देई ||७||

जीर्ण वसने ती| लेऊनिया देही||
धुंडाळत दाही|शोधे सुख ||८||

कुठे दृष्ट लागे| पावन नात्याला||
बाप का झिंगला| वासनांत||९||

रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: