कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ बालकविता पावसाळी स्वप्न. 2

पावसाळी स्वप्न*


इवलासा मंकू
भलताच भारी
उनाड चपळ
धडपड्या भारी...... 1

या झाडावरून
त्या झाडावर
गोड गोड कैऱ्या
तोडी भरभर......... 2

ओरबडे कधी
चिंचेचाही पाला
मुक्त असे मंकू
धाक नाही त्याला....3

उंच फांद्यांवर
झोके घेतो मस्त
केळी आणि पेरू
करतोय फस्त...... .4

ना शाळेचा ताण
ना आईचा दरारा
मनमौजी पठ्ठ्या
उधळतो वारा....... 5

पावसाळी स्वप्न
की घर असावे
आईच्या कुशीत
दडून बसावे........ 6

पुन्हा आठ माही
फक्त हुंदडतो
घर बांधायचे
विसरून जातो.....7



रचना
*शिल्पा म.वाघमारे*
   स.शि मालेगाव खुर्द
     ता गेवराई जि बीड
10/6/19

(दि. ०८/०२/ २०२१)

शीर्षक :पावसाळी स्वप्न


इवला टिवला मंकू 
भारी उनाड  खट्याळ 
वाघोबाची करी स्वारी
जंगलगावचा लाडका बाळ... ||१||

ओरबडे चिंचपाला
उड्या मारी झाडावर
केळी,पेरू करी फस्त
कोण घाली त्या आवर?... ||२||

त्याला शाळेचा का ताण! 
आई, बाबांचा दरारा
मनमौजी पठ्ठ्या फांद्यांवरती
उधळत स्वैर  वारा...||३ ||

पावसांत पाही स्वप्न 
टुमदार  घर हवं
पोटोबाचे पुरवी लाड
गवतावरती लोळावं||४||

आठमाही पुन्हा मंकू
फक्त हुंदडत राही 
'उद्या बांधू' हा विचार 
पुन्हा विरुनिया जाई ||५||


शीर्षक :पावसाळी स्वप्न


इवला टिवला मंकू माकड 
उनाड, धडपड्या भारी खट्याळ 
वाघोबाची करतो स्वारी
जंगलगावचा लाडका बाळ... ||१||

ओरबडत कधी चिंचेचा पाला
या झाडावरून, त्या झाडावर
केळी,पेरू करतोय फस्त
कोण घालणार सांगा आवर?... ||२||

त्याला बाई कुठे शाळेचा ताण! 
अभ्यासाचा धाक, ना आईचा दरारा
मनमौजी पठ्ठ्या फांद्यांवरती
खुशाल झुलतो, उधळत वारा...||३ ||

पाऊस आला की पाहतो स्वप्न 
टुमदार एक घर असावं
पोटोबाचे सारे पुरवून लाड
गवताच्या गादीवर लोळत बसावं ||४||

उन्हाळा, हिवाळा पुन्हा मंकू
नुसताच आपला हुंदडतो 
उद्या बांधू म्हणत म्हणत 
पुन्हा एकदा विसरून जातो ||५||




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: