कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

मनःपटलावरची शाळा

मनःपटलावरची..... शाळा 

 शाळा नव्हेच फक्त ती
 तर जिव्हाळा जन्मभरासाठी
आठवणींचे रंग सदोदित
मनगाभारी उधळण्यासाठी.... १

 ज्ञानगंगोत्री आईच अपुली
निर्व्याज प्रेमाची बरसात
शाळेतल्या बाई शिकवती
अज्ञानावर करण्या मात.... २ 

शाळा घरअंगण झाली
असा लागला लळा
शिस्तीचे मज धडे गिरवुनी
सावध करी वेळोवेळा.... ३ 

ग म भ न संगे मजला
आचार शुद्धी शिकविली
सद्विचार दिला तिनेच
अन् समृद्धी जीवा लाभली..... ४ 

परखड नेतृत्वाचा आणिक
 निर्णयक्षमतेचाही पाठ पढवला
 स्वैराचार नव्हे स्वातंत्र्याचा
 अर्थ खरा समजावला. ...५ 

छंद मनाचे तिनेच जपले
ना विचार कधी दडपले
मुक्त हिरव्या रानी जणू
हृदयपाखरु झेपावले... ६ 

सुखासह दुःखातही साथी
सच्चे तिनेच दिधले मैत्र
बालपणाचे अजूनही कायम
रेखीव मनःपटलावरती चित्र... ७ 

 रचना शिल्पा म.वाघमारे
स.शि ZPPS मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
 दि. 11.12.2018 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: