कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

जखमा हृदयाच्या... मुक्तछंद..


जखमा हृदयाच्या


शब्द पडलेत फिके आज
प्रतिभेच्या या शब्दकोशातले
का कुणास ठाऊक वाटे
नाहीच जणू मी या जगातले

असंख्य झेलून वार येथे
छिन्न झाल्यात भावना
व्यर्थ ती वाचाळताही जनसामोरी
नि अपुऱ्या पडताहेत संवेदना

क्षणक्षण बोचती तीक्ष्ण शर
 ऊर फाटणारे शिवू कसे
न सहावे .. न बोलवे
असेच झाले आज काहिसे

या जीवनाच्या मायाजळी
जन्मापासून मृत्यूपर्यंत
श्वास आणि उच्छवासादरम्यानचा
प्रत्येक क्षण ...
मायेने भरलेला नि विकारांनी भारलेला

अनंत प्रश्न खचाखच भरलेल्या मेंदुच्या कोठारात
आणि एकाचवेळी एकमेकांवर तुटूनच पडतात
जणू ...'का' चा पाढा अहोरात्र
किंचाळल्यागत
दाही दिशांवर आदळून शब्द परततात
चिंध्या होतात पुन्हा एकदा
उधळतात मुक्त व्योमी
बांधून ठेवून मज  'जड' (जडतत्त्व) खांबाला
कुणाला सांगावे,विचारावे?
दाखवून ज्या दिसत नाहीत
अगणित जखमा हृदयकोषी
कधीच का त्या भरत नाहीत?

ना जाणीवांचे धुमारे कुठे
ना नेणिवांची खूण आहे
पांडुरंगा झडकरी ये
कसे फेडू जन्मजन्मांचे जे ऋण आहे
मुक्त नाही मी ही जाणते
चुकवून फेरा कर्मगतीचा
सोहळा होऊ दे जन्म हा
देई वर केवळ निस्वार्थ सेवेचा...

रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
बीड
दि. १५.०८.१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: