कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

तग आणि तगमग... अंकूर

* अष्टाक्षरी

     *तगमग आणि तग*

तिची गर्भारली कूस
तुझा मिळू दे उबारा
धरा चातकी तान्हेली
तिला लाभू दे निवारा... १

दडलेला, कोंडलेला
असा रुसतो, छळतो
भेगाळल्या वावराच्या
खेळ जीवाशी खेळतो... २

देतो चुकाराही ढग
आस लावून फिरतो
आसावल्या डोळ्यांतून
अविरत बरसतो... ३

स्पर्श अमृतसरींचा
बिजा त्या मरणासन्न
जीव जीवात येऊ दे
देई सुगंधाचं दान... ४

तळमळे दिसं सारा
रातं फेरतसे कळा
प्रसववेदनांहुनी
जीवघेण्या तिच्या कळा... ५

टिपूसही डोळ्यांतले
आता दिसेनासे झाले
बांध फोडणारे चक्षू
बरसणं विसरले... ६

दुःखांचीच ही चलती
सुख झालं रे लाचार
राम नुरे जगण्यात
कसा ओढावा संसार... ७

एक माझ्या घासासाठी
धरा धरतेया तग
तगमग जाणवेना
नभा सखीची का मग?... ८

माय चराचरांची भू
अन्नपूर्णा नि आधार
अपराधी मीच जरी
साही निमूट ती भार...९

अंत पाहू नको विठू
तृप्त तिजला होऊ दे
बरसून लेकरांची
बापा काळजी सरु दे... १०

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
दि १०.०५.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: