कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

आयुष्यात जे राहून गेलं...

आयुष्यात जे राहून गेलं...


दारी उभ्या संधीचं
सोनं करायचं राहुन गेलं...
खूप होतं जगण्यासारखं
पण जगायचं राहून गेलं... 1


मरणाच्या दारी उभा मी
श्वास अखेरचे मोजतो आहे
गुंता सोडवता मोकळे
श्वास घ्यायचं राहून गेलं... 2

धकाधकी नि दगदगीत
एकटाच धावत होतो मी
मृत्यू हाच अंतिम विसावा
सत्य स्वीकारायचं राहून गेलं..3


झोकून अथक कर्मी स्वतः
मी मलाच चिरडत होतो
कुण्या प्रवाही वाहत आहे
ते पहायचंच राहून गेलं... 4


वाहून घेतले जिने स्वतःला
फक्त माझ्या साथीसाठी
दमलीस का ग प्रिये? एवढं
विचारायचं राहून गेलं... 5

अमाप लोळवलीत सुखे
चिमण्या पिल्लांच्या पायाशी
पण हवा होता त्यांना जो
वेळ द्यायचं राहून गेलं... 6


मजवर रुसलेल्या आप्तांना
पुन्हा पुन्हा समजावत होतो
मी नाहीच मुळी हो 'तसा'
हे सांगायचं राहून गेलं.. .. 7

कर्तव्य म्हणत निशदिन
माझ्याशीच कधी लढत होतो
का आणि कशासाठी??
विचारायचं राहून गेलं.... 8


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि.6.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: