कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

शिक्षणाची वारी

*शिक्षणाची वारी*

ज्ञानियांची प्रेरणा,
अचेतनांची चेतना,
ज्ञान धनाची पंढरी
........ शिक्षणाची वारी||1||

प्रगतीचे गुपीत
अप्रगतांचे हित
आश्चर्ये अगणित
....... शिक्षणाची वारी||2||

गर्व सारे हरी
शंका दूर सारी
ज्योती होतसे तिमिरी
........ शिक्षणाची वारी||3||

आदर्शांचा महामेरु
विकारांसी अव्हेरू
नेई यशाच्या शिखरी
....... शिक्षणाची वारी||4||

मैत्रांच्या झाल्या गाठी
तर कुठे गळाभेटी
नेत्री आसवांची दाटी
......... .. शिक्षणाची वारी||5||

कौतुकाचा तो सोहळा
गुरुजन झाले गोळा
माझ्या लेकरा उद् धारी
.......... ..शिक्षणाची वारी||6||

शाबासकीची थाप
देई माझा बाप
मन घेई हो भरारी
........ अशी शिक्षणाची वारी||7||

आम्ही झालो वारकरी
शंका नच उरे उरी
लढण्या शस्त्र देई करी
............ही शिक्षणाची वारी||8||

धन्य धन्य हो जाहलो
जसे पुन्हा रे जन्मलो
अज्ञानाते वार करी
..............शिक्षणाची वारी||9||

ज्ञानरंगात रंगलो
चंद्रभागेतचि न्हालो
वाटे ज्ञानाची शिदोरी
........ .....शिक्षणाची वारी||10||

यशोगाथाने भारावले
पथनाट्याने वेधिले
   स्वैर चित्त स्थिरावले
......अशी शिक्षणाची वारी ||11||

काय वर्णावा महिमा
खरचं... लय लय भारी
....... शिक्षणाची वारी
......... शिक्षणाची वारी ||12||

*रचना :- श्रीम. वाघमारे शिल्पा मनोहर*..
. स. शि. मालेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड
दि १०.०५.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: