कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

पावसाची सर

पावसाची सर

आली पावसाची सर
नभ झाकलेलं सारं
दाटलेला गहिवर
अनुरागी मनावर ¦¦१¦¦

येता सर पावसाची
बघ झुकलं आभाळ
आलिंगन सजनीला
देण्या झालासे आतूर ¦¦२¦¦

आज पावसाची सर
भासे मौक्तीकांची सर
रुळे गुंफिलेली माळ
धरणीच्या वक्षावर ¦¦३¦¦

आली पावसाची सर
तरारले तरुवर
कुशीतून वसुधेच्या
मृदू प्रसवे अंकुर ¦¦४¦¦

आली पावसाची सर
माझा विठू बरसतो
अगणित हातांनीच
आशीर्वत उधळतो ¦¦५¦¦

आली पावसाची सर
जशी सुखाची लहर
तिच्यासवे झुलताना
आनंदले चराचर ¦¦६¦¦

आली पावसाची सर
दाटे मनी हुरहुर
अंग भिजे आठवाने
काळाजात ही काहूर ¦¦७¦¦

आली पावसाची सर
तिची काय बाई तर्‍हा
कधी थेंब मोतियांचे
कधी कोसळती धारा ¦¦८¦¦

आली पावसाची सर
 तुझा आठवे उबारा
विरहा न साहे आता
दिनरात अश्रुधारा ¦¦९¦¦

आली पावसाची सर
कस्तुरीने गंधाळली
तिची एक एक सर
माझ्या मनी साठवली ¦¦१०¦¦

(दि. 6.6.2018)

*शिल्पा म.वाघमारे*
स.शि. मालेगाव खुर्द
ता.गेवराई जि.बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: