कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १५ जुलै, २०१९

मोरपंखी स्पर्श


(शृंगार रस)

मोरपंखी स्पर्श

प्रितसरींत श्रावणी साजना
धराही चिंब-चिंब नाहली
हाय भडकलाच तो वन्ही
वणवाच ती चेतवून गेली... ||१||


ये,विरहाचा विरह होऊ दे
उबारा श्वासांचा देई मंद
अधरदली भ्रमर होऊनी
अलवार होशील ना बंद! ..||२||


शहारलेल्या उधाण आले
गोठली,भारली बघ निशा
मंद - मंदश्या चाहुलीने
रोमारोमांत चढली नशा... ||३||


कोण अधीरता उमळली
नच सरावी धुंद यामिनी
साद तुजला घालताती
नाद ही कंकण-पैंजणी... ||४||


काया ही अधीर उमलण्या
मोरपंखी स्पर्श दे अधरी
पुन्हा पुन्हा मग उचंबळते
लाट या चातकी तनुवरी... ||५||


प्रीत सुमनांच्या सेजेवरती
प्रीतजळी शब्दही भिजावे
नशा चढावी अशी झिंगुनी
बाहुपाशात राजसा रिझावे...||६||


मिसळून रे तुझ्यात न कळे
जगी कुण्या अनोख्या वावरते
मिठीत तुझिया थिजूनी जाता
सखी तुझी साजना बावरते..|| ७||


करीन बहाणा मी अधरांचा
लटकलाज आणूनी डोळ्यांत
पांघरुन तूही तनूस माझिया
मधुगंधी होऊ दे प्रणयरात...||८||


रचना

शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका, बीड
दि.02.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: