कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २७ जानेवारी, २०१९

मोल प्रजासत्ताकाचे

मोल प्रजासत्ताकाचे


जोखड गुलामीचे मायभू
खांद्यावरती पेलत होती
वार बोचरे, असह्य तरीही
अंगावरती झेलत होती... १

कोण कुठले मूठभर होते
निमित्त साधून आले कसले?
देता ओसरी प्रेमाखातर
पायच पसरून होते बसले... २

सुपुतांनाही तिच्या मग हे
सहावेनाच झाले सारे
धगधगत्या क्रांतीचे गगनी
मग तूफानच जाहले वारे ... ३

ज्योत पेटली मशाल झाली
क्रोधाग्नी उसळला नयनी
बाल चेतले, माता-भगिनी
अवतरल्या रणरागिणी ...४

श्वासही आता गौण होते
भूमातेच्या या संकटापुढे
स्वार्थाचीही मती खुंटली
वीरांच्या चढत्या स्फूर्तीपुढे...५

स्वातंत्र्याचे पंखच दिधले
लावूनी बाजी प्राणांची
अमोल रत्ने आज तोकडी
किंमत करण्या मुक्त नभाची...६

घटनेने देऊनी आधार
आकार दिधला स्वातंत्र्याला
सुलभ अपुले जीणे झाले
तरी उधाण आलं हो भ्रष्टाचाराला
...७

नेणिवा वीरगतीच्या जागवा
जागवा, चेतवा रे कृतज्ञता
प्रजासत्ताकाचे मोल जाणूनी
सोहळ्यास येऊ द्या सार्थकता...८

भारत हा गणराज्य माझा
ऊरी धडधडतो बनूनी श्वास
अबाधित हा ठेवा राखणे
हा जीवनाचा अविरत ध्यास...९

 रचना
शिल्पा मनोहर वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
तालुका गेवराई जिल्हा बीड
दि. 26 1 2019