कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २० जानेवारी, २०१९

*मानाचा मुजरा*


  1. *मानाचा मुजरा*

माय मराठी स्वीकार तू
मान-मुजरा या भक्ताचा
तुझ्याच पायी समर्पित
कणकण हा रक्ताचा     ¦¦१¦¦

तुझ्याच रक्षणासाठी क्षणक्षण
तिष्ठत मर्द मावळा इथला
तुझ्या पोटी जनन माते   
धन्य जन्म हा जाहला    ¦¦२¦¦

माय तू सर्वस्व आमुचे
नव्हे फक्त तू एक भाषा
विश्वरूप तुजला लाभावे
हिच मनी मानसी आशा   ¦¦३¦¦

तुझ्याच चैतन्यातून माते
प्रसवली मराठी संस्कृती
दिगंतात पसरो सदैव
तुझ्याच थोरवीची किर्ती   ¦¦४¦¦


तुझी गोडीच अवीट
अमृतानेही लाजावे
शब्ददरिद्री मी माते
गुण किती तुझे गावे       ¦¦५¦¦

अलंकाराने मढलेली
तुझ्या लावण्याची खाणी
भावस्पर्शी भिडलेली
साऱ्या बोलींची तू राणी   ¦¦६¦¦

"माय"म्हणूनच आम्ही
साद तुजला घालतो
वैश्विक तुझ्या रुपासाठी
पदोपदी झगडतो          ¦¦७¦¦

मायदेशी रहावे वा
जावे परक्या देशास
अवघ्या ब्रह्मांडात भासे
माय मराठीचा वास       ¦¦८¦¦

ज्ञानदेवे सांडियले
दीपिकेच्या ओव्यांतून
सुधा जीवास तारते
माये तुझ्या पान्ह्यातून    ¦¦९¦¦

भजन,किर्तन ,भारुड
गवळणी कर्णमाधुरी
पोवाड्याची मर्दानगी
आम्हा माहेरची शिदोरी   ¦¦१०¦¦

  

रचना ✍🏻
शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका
  दि. 11/08/2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: