जीवन एक संघर्ष लहर लहर उफाळते जेव्हा सागरी मनाच्या अनंत तरंग नाचती पटलावर विचारांच्या...१ गुंतागुंत पेच सारा मांडलेला भोवती कळेना सोडवू कसा मळभ दाटती सभोवती...२ जीवनाची नौका एकटीच भरकटते तुफानी वाहताना झेलीत अकर्मिक आरोप डळमळते भयात साहताना...३ स्वप्न नवे रेखताना नव्या गुंतता विश्वात माझ्याच बांधवांनी कोंडले मज कोषात...४ संस्कार आईबापांचे ज्ञान गुरुंचे थरथरले क्षणात विचारांनी माझ्या थैमान अंतरी घातले...५ मी एक स्वतंत्र आत्मा सुखशांतीच्या शोधात गुरफटतो मायाजाळी का होते मन विचलित..?.६ उत्तरालाही पडलेत प्रश्न दिशाहीन भयभीत दिशा आकाशी आकांत गहिरा धरेची विरताहे आशा...७ संवेदनाहीन वाहतो वारा कुणी रुक्षता ही पेरली काळाच्या विकारी जाळ्यात सारीच कशी हो ओढली...८ का फाटले आभाळ सत्य हरवले अंतरीचे तेजस्वी ज्योती जागृती साधना लक्ष्य आता टोकाचे..९ अस्तित्व भंगण्या आधी कृपाकटाक्ष देई हे कृपाळा विनवित लेकरु पायाशी पुरे कसोटी आता दयाळा..१० मीच मला गवसू दे मग कसली खेचाखेची जिव्हेसम जगेल खुशाल तमा न राहिल बत्तीसांची...११ कोडे की आहे उत्तर जीवन हा एक संघर्ष दुःखाच्या खाणीतूनही सुखद आनंदामृताचा स्पर्श..१२ रचना © शिल्पा म.वाघमारे स.शि.मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड दि 10.06.2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा