अष्टाक्षरी रचना
*लेकीचा बाप*
प्रसवला बाप आज
जणू नव्याने जन्माला
जन्म घेता हो लेकीने
अानंदामृतात न्हाला ॥१॥
तिच्या कोवळ्या स्पर्शाने
मनोमन भारावला
तिच्या बोबड्या बोलांनी
सारे भान विसरला ॥२॥
तिच्या काळजीने तोही
क्षणभर गोंधळला
तिच्या सुखा पायी त्याने
जन्म कष्टाला वाहिला ॥३॥
रात दिन एक त्याचे
किती राबला राबला
त्याच्या घामाच्या धारांचे
शोभे तोरण घराला ॥४॥
तिच्या पायी सुख देण्या
नाही आराम जीवाला
मायेच्या हो पंखांखाली
ऊब देई तो पिल्लाला ॥५॥
दुःख वेदनांचा ढीग
त्याने ऊरात दाबला
आव्हाने पेलताना तो
फांदीपरिस वाकला ॥६॥
त्याची प्रेरणा नि थाप
दुहितेच्या सोबतीला
तिच्या यशाचा आनंद
त्याच्या भिडे आकाशाला ॥७॥
वरकरणी काटेरी
भासे फणस जगाला
मऊ मधुर मगज
असे बापाच्या आतला ॥८॥
पाठवणी करताना
हुंदकाही आवरला
अन् क्षणातच त्याच्या
कुंभ मेघांचा फुटला ॥९॥
आज दृष्टांनी लावली
दृष्ट बापाच्या नात्याला
क्रूर वासनेच्या वास
भय लेकीच्या जीवाला ॥१०॥
रचना
📝📝📝
*शिल्पा म.वाघमारे*
*सहशिक्षिका*
*मालेगाव खुर्द ता गेवराई*
*जि बीड*
6/23/18, 18:47
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा