कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

प्रेमरससरी



  प्रेमरससरी

रुणुझुणु पावलांनी
रिमझिम बरसला
धमकल्या धरणीत
चिंब पाचू हरखला...१

काळ सोसून वैशाखी
जीव 'लाही' वसुधेचा
चिंतातूर आषाढात
रोखलेला श्वास तिचा...२

पाखरेही जायबंदी
घरट्यात काकडली
तमा सरली उद्याची
मनोमन फुललेली...३

सजनीच्या काळजात
झुले प्रीत साजनाची
अंग अंग शहारलं
ओढ बेबंद श्वासांची...४

चिंब क्षण, काया, मन
गंध ल्याली काळी माती
शुष्क नक्षत्राचं न्हाणं
न्हाती माणसांची नाती...५

बरसाव्या श्रावणात
शुद्ध् प्रेमरससरी
तुझ्या पायी विरु दे रे
विठू दंभ ते विकारी...६


रचना
शिल्पा म वाघमारे
स.शिक्षिका
बीड
दि. 8.8.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: