कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

तू सोडून मला जाताना

*तू सोडून जाताना*

तू सोडून मला जाताना
अनामिक काही दाटले होते
ऊरातले हुंदके दाबताना
आभाळ मनाचे फाटले होते

गुंतले कधी तुझ्यात
कळले मला न तेव्हा
नकळत हरवल्या मनाचे
तरंग डोळ्यांत साठले होते..

त्या आणाभाकांचीही
तूज भूल कशी रे पडली
स्पर्शास मखमली सखया
अद्याप थांबले होते...

कातरवेळा भांबावलेल्या
मनी कापरे, नयनी लाज
ओठी भिजल्या शब्दाने
कैकदा हृदय गाठले होते...

ती भेट शेवटाची
नियतीचा कसला वार
श्वास तुलाच वाहिले सारे
क्षण तिथे गोठले होते...

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि २७.०९.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: