कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

(शेतकरी).. दर्दी जुगार


(शेतकरी).. दर्दी जुगार



गेल्या वर्षीची सारी कमाई

मातीत एकदाच गाडून पहा

उपरोधिक बोलण्याआधी

शेतकरी होऊन जगून पहा.. १


कोरडवाहू मातीचं सोनं करण्या 

घामाच्या धारांनी  सिंचतो रानं

आसवांच्या धारांचे बांध फोडूनी

नित्य गातो धरणीला हिरवं गाणं २


दाटल्या मेघांना आळवत राहतो 

पंचप्राण करून श्वासांत गोळा

सैरभैर मन चिंतातूर नि बेचैन

आत दुःखाच्या देत प्रसवकळा ३


पाप त्याचं एवढचं का?की तो 

जगण्यासाठी पुरवितो दाणा

बीजास पोसताना लेकरावाणी

भिजे अंगाई, जीव होई खेळणा ४


दर्दी जुगार खेळतो शेतकरी

होतं नव्हतं लावतो पणाला

वैफल्यातून आत्महत्या म्हणजे

जबाबदारी कळत नाही का त्याला? ५

             रचना
©शिल्पा म.वाघमारे
स.शि जि प प्रा शाळा
मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 23.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: