कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

तू पुन्हा येऊ नकोस


तू पुन्हा येऊ नकोस

तू पुन्हा येऊ नकोस
हे 'क्रोधा' माझ्या मनी
शांतीतत्व 'मूळ' आत्म्याचे
तुजकारणी विवेक जाती सुटूनी ||1||

'लोभ'नि 'मोहा' तव वासना
नकोच आता डोळ्यांपुढती
डोळसासही अंधपणाची
जीवास सदा देत अनुभूती...||2||

'मदा'ने भारिता हे मन
भुलवी नीती- न्याय रे
घर तुझेच मग होई खाली
तुच्छतेचे मस्तिष्कात वारे...||3||

परनिंदेस प्रवृत्त करसि
'मत्सरा' तू लयास नेशी
स्वतःसह परदुःखासही
तूच एक कारणीभूत होशी...||4||

प्रपंच गुंफण्या हेतूच फक्त
कामी आणावे 'काम' ते
विचलित करिसी लक्ष्यास तू
अर्पिते तुम्हा प्रभूचरणांते.....||5||

संयमाची ज्योत अविरत
दिप्त अंतरात तेववावी
नाम 'राम' उपचार आता
तयानेच चेतना फुलवावी....|| 6||

✍️
©शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: