(शंभर वर्षे पूर्ण झालेल्या जीर्ण शालेय इमारतीचे काव्यरुप आत्मकथन...)
*अस्तित्व*
तुझ्या खोल हृदयागाभारी
मी फक्त 'आठवण' आहे
कडू गोड आठवांची
आता फक्त साठवण आहे... १
त्याही खुणा जातील पुसल्या
कधी काळाच्या लाटांनी
पाऊलखुणा राहतील कायम
आसवे भिजल्या वाटांनी... २
बोबडे बोल बोलणारी
कित्येक आली चिलीपिली
पाखरं आता मोठी झाली
पंख फुटले, उडून गेली... ३
बोबड्या 'त्या' बोलांची
मी समृद्ध करत होते बोली
वाटलंच नव्हतं मला तेव्हा
कधी माझ्यावरही लागेल बोली...४
चढाओढ चाललेली एकेकाची
अन् आतच खोलवर तुटत होते
श्वासांची पुरती कोंडी, अन् सारेच
ओघाने सुटत होते...५
माझ्या जीर्ण कायेचाही
लिलाव झाला एकदाचा
निष्प्राण एकाकी मला
ठरावही झाला पाडण्याचा...६
अस्तित्व शतकाचे जरी
खूप साहलीत मी उणीदुणी
तसंही गलितगात्र झालेल्यांना
नसतंच म्हणा कुणी वाली...७
माझा कण कण येईल का वाचता?
एक एक तो जणू ग्रंथ आहे
पण लक्षात कोण घेतो?
सारं आता इथे संथ आहे...८
डोळ्यांत माझ्या स्वप्नं तेजस्वी
अजूनही ते स्पर्श ओले
भळभळ ही व्यर्थच आहे
सत्य मी ही आता स्विकारले...९
असू द्या .. जाऊ द्या..
अभंग होऊ देत जीणं तुमचं
हे अस्तित्व भंग पावू द्या
नवपरिवर्तनाचे वारे आता
विद्यामंदिरात या वाहू द्या...१०
वसंताची चाहूल लागली
एवढ्यात येईल बघा नवती
मी माझंच काय घेऊन बसले
फक्त पिल्लांची माझ्या होवो प्रगती...११
चला निरोप घेते शेवटाचा
फार मनाला तुम्ही लावू नका
नवप्रवाही वाहताना ज्ञानवाती पेटवा
आता मागे पाहू नका...१२
काव्यरचना ✍️
*शिल्पा मनोहर वाघमारे (कुलट)*
*(स.अ.) लो अ हो जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी, ता बार्शीटाकळी जि अकोला*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा