कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १५ जुलै, २०१९

पाऊस स्पर्श


(अष्टाक्षरी रचना)

पाऊसस्पर्श...

अवनीस पावसाचा
स्पर्श पहिलावहिला
आनंदाला उधाणच
अणुरेणू गंधाळला... १

महागडी हो अत्तरे
तयापुढे गंधहीन
अनामिक प्रेमबंध
भासे जग सारे दीन... २

मेघ तेच, तेच पाणी
वेगळाले तरी स्पर्श
निरागस रुपातून
लेकरांचा होई हर्ष... ३

कधी होई प्रेमसाक्षी
प्रणयास फुलवितो
श्वासाधार बळीचा जो
विरहिण का जाळतो... ४

रुसलेला की कोपला?
त्याची द्विधा कळेचना
खोटा पसारा जगाचा
त्यास हुरुप येईना... ५

कोरडाच हा पाऊस
जाणवेना हो ती ओल
संवेदना काळजाची
हाय रुक्ष आणि खोल...६

चक्षू चातकी जनांचे
शिणलेले, आसावले.
तमी वाट भविष्याची
अवजड ओझे झाले... ७

राजा सृष्टीचा पालक
पोसतोया सालभरी
गळे तरुंचे चिरतो
तरी आम्ही अविचारी ...८


रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खु 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: