कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

आजी

 

 आजी...हरवलेलं नातं


मधाळ पाझर |जणू माय दुजी|| 

असते ना आजी | आम्हासाठी ||१||


 स्पर्श सुसंस्कारी | लाभला मजला||

जन्म हा जाहला | धन्य-धन्य ||२||


रखरखलेला | तिचा  कर गाली ||

टोचे बाल्यकाली | चरचर || ३||


आज आठवाने | ओघळती धारा ||

 स्पर्श  तो गहिरा | प्रेमभरा ||४||


आधार वाड्याचा | जणू की कोंदण ||

 शीतल चांदणं | शरदाचं ||५||


तेवती समई | मृदू मंद स्वर ||

कथेचे भांडार | आजी माझी ||६||


 अनामिक ऊब | गोडी ती मधाची ||

ओवी हो जात्याची | आजी माझी ||७||


हरीनामी भिजे |ओटा तुळशीचा ||

नाद चैतन्याचा | घुमे कानी ||८||


तिच्या आठवाने| आसवे दाटली ||

गाभारी भेटली | स्वप्नवत||९||


संकुचली मने | नाती विभागली ||

आजी 'हरवली' | सापडे ना ||१०||